कापूस खरेदीत ‘सीसीआय’कडून महाराष्ट्रावर अन्याय!
- By -
- Jan 10,2024
कापूस खरेदीत ‘सीसीआय’ने तेलंगणात आघाडी घेतली असून महाराष्ट्रासह इतर राज्यांत पिछाडीवर आहे. सीसीआयने 1 ऑक्टाेबर 2023 ते 7 जानेवारी 2024 या काळात देशभरात एकूण 19 लाख 65 हजार गाठी कापसाची खरेदी केली. त्यात सीसीआयने एकट्या तेलंगणात 15 लाख गाठी कापसाची खरेदी केली असून, उर्वरित कापूस उत्पादक राज्यांमध्ये केवळ 4 लाख 65 हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आला. महाराष्ट्रात तर केवळ 70 हजार गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
सीसीआयला कापूस विकताना शेतकऱ्यांना आधी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. त्यासाठी ऑनलाइन पेरापत्रक सादर करणे अनिवार्य आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरापत्रकात कापसाचा उल्लेख नसल्याने त्यांना सीसीआयला कापूस विकताना अडचणी येत असल्याचे सीसीआयचे अधिकारी सांगतात. दुसरीकडे महाराष्ट्रातील कमी कापूस खरेदीला केंद्र व राज्य सरकारचे उदासीन धाेरण जबाबदार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.